नाथषष्ठी सुटीबाबत मुख्याध्यापकांत संभ्रम

नाथषष्ठी सुटीबाबत मुख्याध्यापकांत संभ्रम
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:धनंजय लाखुळकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, ता. १९ :दरवर्षी नाथषष्ठीला जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत सुटी घोषित केली जात होती. मात्र, यंदा शिक्षण विभागाने हा निर्णय मुख्याध्यापकांच्या अधिकारात दिला आहे. परंतु, अनेक मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारातील दोन सुट्या याआधीच मंजूर केल्याने आता शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की, सुटी कोणत्या अधिकाराखाली जाहीर करावी?
जिल्हा परिषद व खासगी शाळांना शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटी देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारातील दोन सुट्या अगोदरच दिलेल्या आहेत. त्यामुळे नाथषष्ठीला सुटी कुठून द्यावी, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत सुटी जाहीर केल्यामुळे कोणताही गोंधळ होत नसे. मात्र, यंदा शिक्षण विभागाने ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकल्यामुळे प्रशासनावर ताण आला आहे. नाथषष्ठीला सुटी देण्याचा निर्णय आधीच शिक्षण विभागाने घेतला असता, तर मुख्याध्यापकांना सुटीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेची आवश्यकता भासली नसती. शिक्षण विभागाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा आणि वार्षिक सुटीच्या यादीत नाथषष्ठीला अधिकृत सुटी घोषित करावी, अशी मागणी केली आहे. आता शिक्षण विभाग आणि, जिल्हाधिकारी कार्यालय यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
