
बारावी वाणिज्य शाखेच्या परीक्षेत तोतया परीक्षार्थी वर गुन्हा दाखल.
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज
जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने बारावी परीक्षेच्या तुर्काबाद खराडी येथील परीक्षा केंद्र क्रमांक 0058 हरी ओम ज्युनियर कॉलेज तुर्काबाद खराडी या परीक्षा केंद्राला शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी भेट दिली असता बारावीचा वाणिज्य शाखेचा पेपर सुरू होता. परीक्षा केंद्रावर एकूण 29 पैकी 27 परीक्षार्थी परीक्षा देत होते. दोन परीक्षार्थी अनुपस्थित होते. यावेळी परीक्षा केंद्राची तपासणी करत असताना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित परीक्षार्थी याला त्याचे नाव विचारले असता वडिलांचे नाव सांगता आले नाही. तसेच त्याच्या हॉल तिकीट वरील जन्म तारखे मध्ये पेनने खडाखोड केल्याचे आढळून आले संबंधित परीक्षार्थी याच्या हॉल तिकीट वर केंद्र संचालकाचा सही शिक्का आढळून आला नाही. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला. विद्यार्थ्याचे हॉल तिकीट व परीक्षे संबंधी चे ऑनलाइन रेकॉर्ड तपासले असता संबंधित परीक्षा देणारा हा तोताया आढळून आला. भरारी पथक प्रमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाठकर यांनी तात्काळ संबंधित तोतायावर परीक्षा केंद्र संचालकामार्फत पोलीस स्टेशन वाळूज येथे गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली. संबंधित परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तात्काळ बदलला असून याप्रकरणी संबंधित सर्वांवर कठोर कारवाईची पाऊले उचलली आहेत . संपूर्ण बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात यावी यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आपल्या भरारी पथकाच्या माध्यमातून अत्यंत कठोर पाऊले उचलत आहे. बारावी बोर्ड दहावी बोर्ड च्या परीक्षा कॉपीमुक्त झाल्या पाहिजेत यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सर्व स्तरावर प्रयत्नशील आहे. संपूर्ण जिल्ह्यात बारावी बोर्ड व दहावी बोर्ड परीक्षेच्या दरम्यान कॉपी संबंधी अथवा अन्य कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल व संबंधित परीक्षा केंद्राची मंडळ मान्यता कायमची रद्द करण्यात येईल याचा पुनरुच्चार माननीय शिक्षणाधिकारी यांनी यावेळी केला.
