
यू-डायस प्लस प्रणालीवर नोंदणी बंधनकारक
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, ता. २३ : राज्यातील सर्व शाळांनी यू-डायस प्लस प्रणालीमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अचूक माहिती अंतिम करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. केंद्र सरकारने २० मार्च २०२५ ही अंतिम मुदत दिली असून, याआधारे शालेय शिक्षणातील वार्षिक नियोजन, अंदाजपत्रक तसेच पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) अहवाल तयार केला जाणार आहे.राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका शिक्षण विभागांना दिलेल्या सूचनांनुसार, शाळांनी विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची माहिती आणि इतर शालेय तपशील अचूक भरून २५ मार्चपूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे; तसेच या नोंदींची खातरजमा करून प्रमाणपत्राची प्रत शिक्षण विभागाच्या ई-मेलवर पाठवावी आणि यू-डायस प्लस पोर्टलवर अपलोड करावी. शाळा स्तरावर यू-डायस प्रणालीत माहिती नोंदविण्याचे काम ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाले आहे. मात्र, अद्याप काही शाळांनी माहिती अद्ययावत केली नाही.परिणामी, केंद्र सरकारने दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी सर्व शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, सहायक संचालक (कार्यक्रम) सरोज जगताप यांनी दिले आहेत.
शिक्षण योजनांसाठी महत्त्वाची प्रक्रिया
यू-डायस प्लस प्रणालीतील आकडेवारी शालेय शिक्षणाच्या विविध योजनांसाठी महत्त्वाची असते. या नोंदींच्या आधारे शिक्षणाचा दर्जा मोजला जातो आणि शाळांसाठी अनुदान व योजना आखण्यास मदत होते. माहिती चुकीची राहिली, तर नियोजनावर परिणाम होऊ शकतो. राज्यातील शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती नोंदविण्याच्या प्रक्रियेत अडचण आल्यास स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असेही सुचविले आहे.
