
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात २० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत असून या कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे, येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा-समाधाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरीता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपये, नरेगामधून २८ हजार आणि शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, आता यामध्ये अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यामुळे आता यापुढे लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्राचे वाटप आणि १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
