माधुरीसाठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेने; हत्तीणीच्या प्रेमापोटी आज अभूतपूर्व पदयात्रा
कोल्हापूरकरांना त्यांची लाडकी माधुरी परत मिळणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे

🐘 माधुरीसाठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेने; हत्तीणीच्या प्रेमापोटी आज अभूतपूर्व पदयात्रा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
🔸 एका हत्तीणीवरील प्रेमापोटी हजारो नागरिकांनी एकत्र येऊन तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे, हे चित्र तसे दुर्मिळच. पण कोल्हापूरकरांनी आज हे चित्र सत्यात उतरवले आहे. आपली लाडकी हत्तीण माधुरी हिला परत आणण्याच्या मागणीसाठी आज नांदणी येथून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
😢 महाराष्ट्रातील हत्तीणीला निरोप देताना संपूर्ण गाव का रडलं ? 😳 गुजरात अन् अंबानींचा निषेध गावाने का केला ?
🔸 आज सकाळी नांदणी येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. यात्रेत केवळ तरुणच नव्हे तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माधुरी परत मिळवण्याचा दृढनिश्चय दिसत होता. आंदोलकांनी परिधान केलेल्या #JioBoycott आणि माधुरी परत करा अशा आशयाच्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
🔸 ही पदयात्रा सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. यात्रेच्या स्वागतासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरातही प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
🔸 कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पदयात्रेतील शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. एका मुक्या प्राण्यासाठी नागरिकांनी दाखवलेले हे प्रेम आणि एकजूट अभूतपूर्व असून, प्रशासनाने या भावनेचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता कोल्हापूरकरांना त्यांची लाडकी माधुरी परत मिळणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
