दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजाजनगर येथे श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह प्रारंभ
पंचक्रोशीतील सर्व भाविक सज्जन, भक्तगण व सेवेकरी यांना या अतिदुर्लभ अध्यात्मिक सेवेत सहभागी होऊन स्थापित देवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजाजनगर येथे श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह प्रारंभ
२३७९ महिला व पुरुष सेवेकरी करत आहेत सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी: राजू जंगले बजाजनगर
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष परमपूज्य गुरूमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने बजाजनगर येथील दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड-नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.
दिनांक ०९ डिसेंबर पासून या सप्ताहाला सुरवात झाली असून दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी महानैव्यद्य आरतीने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात हजारोंच्या संख्येने सेवेकरी श्री गुरूचरीञ पारायणासाठी बसले आहेत. यामध्ये महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सप्ताह काळात विविध प्रकारच्या अध्यात्मिक सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
दिनांक ०९ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा सामुदायिक महाभिषेक करून सप्ताहाला सुरवात झाली. तसेच यज्ञभुमी मध्ये मंडलस्थापना, स्थापित देवता अवाहन व अग्निस्थापना करून उत्सवाला सुरवात झाली आहे. दैनंदिनी मध्ये सकाळी ६.०० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, ८.०० वाजता भूपाळी आरती, ८.१५ वाजता नित्यस्वाहाकार, ८.३० ते १०.३० पर्यंत सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण वाचन, १०.३० वाजता नैवेद्य आरती, १०.४५ ते १२.०० वाजेपर्यंत विषेश याग, दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ व श्री रूद्रावर्तने, सायंकाळी ६.०० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती, ७.०० वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, ७.३० वाजता श्री विष्णू सहस्त्रनाम होणार आहे. रोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत महिला सेवेकरी व रात्री ८.०० ते सकाळी ८.०० या वेळेत पुरूष सेवेकरी प्रहरेची सेवा रूजू करणार आहे.
विषेश यागामध्ये दिनांक १० डिसेंबर रोजी श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, ११ डिसेंबर रोजी गिताई याग, १२ डिसेंबर रोजी स्वामी याग, १३ डिसेंबर रोजी चंडी याग, १४ डिसेंबर रोजी श्री रूद्र याग व मल्हारी याग होणार आहे.
सप्ताह कालावधीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या सुत्रातून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ वेळेत गर्भसंस्कार शिबीर, दिनांक १२ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत सर्वरोग निदान शिबीर व सोबतच दुपारी २ ते ४ वेळेत शिशुसंस्कार शिबीर आणि दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १५ डिसेंबर रोजी बली पूर्णाहूती होऊन दुपारी १२.३९ वाजता श्री गुरूचरीञ ग्रंथातील श्री दत्त जन्माचा चौथा अध्यायाचे वाचन करून महानैवेद्य आरतीने श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच दिनांक १६ डिसेंबर रोजी श्री सत्य दत्त पूजन, देवता विसर्जन करून सप्ताहाची सांगता होणार आहे.
धकाधकीच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य व मनःशांती मिळवण्यासाठी सप्ताहकाळ ही अभूतपूर्व पर्वणी ठरणार आहे. बजाजनगर केंद्रातील व्यवस्थापन व नियोजन प्रतिनीधींच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक सज्जन, भक्तगण व सेवेकरी यांना या अतिदुर्लभ अध्यात्मिक सेवेत सहभागी होऊन स्थापित देवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
